जांभूळ हे फळ मधुमेह रुग्णांसाठी अतीशय उपउक्त आहे. मला बरेच दिवसांपासून जांभूळ सरबत बनवायचे होते. २-३ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून पहिले. पहिल्या वेळेला बनवले तेव्हा अक्षरशः टाकून दिले. पिताना घश्याला बांध बसल्यासारखा होत होता. त्यावेळी मी जांभळाचा बलक नुसताच मिक्सरमधून काढून त्यात साखर, मीठ आणि पाणी घातले होते. खूपच कडवटही लागत होते ते सरबत.
त्यानंतर अख्खी जांभळे उकडून, नंतर त्याचा गर वेगळा करून त्यात मीठ व पाणी घालून सरबत बनविले. ह्यावेळी खूपच आंबट आणि थोडेसे कडवट वाटले. काल मी खाली दिलेल्या कृतीप्रमाणे सरबत केले आणि ह्यावेळी मला ते खूप आवडले.
सरबत खूपच छान झाले आहे. तुम्ही करून बघा आणि मला अभिप्राय पाठवा. ह्या कृतीमध्ये खटकणारी एकच गोष्ट आही ती म्हणजे साखर. मला वाटले जांभूळसरबत मधुमेही रुग्णांना प्यायचे असेल तर ते साखरेशिवाय बनवायला हवे, पण मी खूप प्रयत्न करूनही साखेरेशिवाय बनवू शकले नाही. जर तुमच्याकडे साखरेशिवाय हे सरबत बनवण्याची पाककृती असेल तर मला नक्की पाठवा.
साहित्य
२०-२५ पिकलेली काळी जांभळे
पाव वाटी साखर
अर्धा चमचा मीठ
गरजेनुसार पाणी
कृती
प्रथम जांभळे धुवून, बिया वेगळ्या करून, एका पातेल्यात गर काढून घ्या.
ह्या गरात एक भांड पाणी घालून, हे मिश्रण गरम करण्यास gasवर ठेवा.
२-३ मिनटे उकळल्यावर साखर घालून आचेवरून खाली उतरवा.
मिश्रण थंड होईपर्यंत साखर आपोआप विरघळेल.
थंड मिश्रणात मीठ घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या.
आता ही पेस्ट गाळून एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
सरबत बनवताना ही जांभळाची पेस्ट १ भाग आणि ४ भाग थंड पाणी घाला.
वाढणी: ४-५ ग्लास सरबत
एकूण लागणारा वेळ: ३० मिनिटे
Leave a Reply