
आजची covid-19 कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता मी विचार केला की आज मी तुम्हांला ही आमची पारंपारिक चालत आलेली सर्दी-तापाच्या काढ्याची recipe सांगते.
गेल्यावर्षीच्या lockdown मध्ये अगदी दूरच्या नातेवाईकांना corona ची लागण होऊन देवाज्ञा झाल्याची माहिती मिळत होती. भेटीगाठी होत न्हवत्या. पण या महिन्यात तर कोरोना अगदी दरवाज्यात येऊन पोचलाय. माझा मामा हॉस्पिटल मध्ये आहे आणि माझ्या आज्जीचे corona ने गेल्याच आठवड्यात निधन झाले आहे.
आम्ही आता खूपच जास्त जागरूक झालो आहोत. अत्यावश्यक गोष्टींसाठी सुद्धा घराबाहेर पडणं टाळत आहोत. अजूनपर्यंत आम्ही हा काढा नित्यनियमाने घेत आहोत. माझ्या नवऱ्याची कफ प्रकृती असून त्याला दम्याचा त्रास आहे त्यामुळे त्याला ह्या काढ्याने बराच आराम वाटतो. माझी पित्त प्रकृती असल्याने मी आठवड्यातून एकदाच हा काढा घेते.

लहानपणी पावसाळा सुरु झाला की आई रोज ह्या काढ्याचा मारा आमच्यावर करत असे. कोणतेही कारण सांगून हा काढा न पिण्यापासून सुटका होत नसे. ती आमच्या बाजूला बसून थोडा थोडा बशीत ओतून गरम गरम प्यायला लावत असे. पण लहानपणी कधी मला ताप आलाय किंवा सर्दी झालीय अशी आठवण नाही.
आता वेगवेगळे आयुर्वेदिक काढे घेतले तेव्हा एक गोष्ट जाणवली की हा काढा अजिबात कडू नाही. तुमची लहान मुले जर कडू औषध घ्यायला कुरकुर करत असतील तर त्यांना हा काढा एकदा द्याच. त्यांनाही ह्याची taste आवडेल.
आमची आई ह्याला आळशीचा काढा असं संबोधतते. हा काढा बनवायला अत्यंत सोप्पा आहे पण मुख्य trick आहे ती ही आळशी भाजण्यात. जर आळशी चांगली भाजली नसेल तर काढा अगदी शेंबडा सारखा होतो. मी सुरवातीला बनवायचे तेव्ह्या माझाही असाच लिबलिबीत, अंड्याच्या पांढऱ्या भागाप्रमाणे व्हायचा. पण थोडा धीर धरून आळशी न करपू देता, चांगली परतून परतून भाजून घेतली की हा काढा मस्त होतो. तर हा आळशी-तुळशीचा काढा गरम गरम घशाला शेक लागेल असा प्यायचा.
साहित्य:
१ मोठा चमचा आळशी भाजून
अर्धा छोटा चमचा ओवा
१ छोटा चमचा धणे
१ छोटीशी जेष्ठमध कांडी
२ लवंगा
२-३ तुकडे खडीसाखर
४ काळी मिरी दाणे
२ बेलाची पाने
२ मोठी चहाच्या पाती
२ तुळशीच्या मंजिरी
१५ तुळशीची पाने
२ छोटी आडूळश्याची पाने
१ छोटा तुकडा आलं ठेचून
८-१० पुदिन्याची पाने
१०-१२ लेमन बेझीलची पाने
पाऊण लिटर पाणी
कृती:
आळशीच्या बिया एक वाटीभर घेऊन लोखंडाच्या कढईत मंद आचेवर भाजायला ठेवायच्या.
मधे मधे परतत राह्य्च्या. २ ते ३ मिनिटांनी तडतड असा आवाज येऊन त्या उडायला लागतील.
ह्या वेळी एक झाकण त्यावर पालथ धरून कावीलथ्याने सतत परतायच्या.
३ ते ४ मिनिटांत सगळ्या बिया भाजून कुरकुरीत होतील. ह्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून चमचा चमचा काढा करायला वापरायच्या.
आता एका पातेलीत पाउण लिटर पाणी उकळायला ठेवायचं.
पाणी उकळल की त्यात वर दिलेल्या सर्व गोष्टी घालायच्या.
पाणी उकळून अर्धा लिटर राहिले की gas बंद करायचा.
आता गाळून हा काढा गरमगरम प्यायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी






Leave a Reply