
कच्या केळ्याचे काप
आज मी अगदी कमीत कमी साहित्य वापरून झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ केला नाश्त्याला. तसा हा एरवी कधी बनवला तरीही सगळीकडे फिट्ट बसतो; जेवणाच्या ताटात कोशिंबीरीबरोबर, संध्याकाळी चहासोबत आणि अगदी उपवासालाही.
तुम्ही उपासासाठी साबुदाणा वडे, साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ असे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हे काप नक्की करून बघा. कच्ची केळी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात. घरी आणून ठेवली तरी खूप दिवस ती फ्रीजमध्ये चांगली राहतात. हे काप अगदी झटपट बनतात.
मी ह्यात फार काही मसाले घातले नाही. तुम्ही उपासाला खाणार नसाल तर मी खाली दाखवल्याप्रमाणे सुरणासारखेही fry करू शकता.
उपवासासाठी अगदी सागरसंगीत स्वैपाक बनवायचा असेल तर उपासाची खीर-पुरी आणि रस्सा भाजीही तुम्ही बघू शकता.
आता हे कच्या केळ्याचे काप कसे बनवायचे ते बघूया.
साहित्य:
३ कच्ची केळी
२ छोटे चमचे काश्मिरी लाल तिखट
अर्धा छोटा चमचा मिरी पावडर
१ मोठ्या लिंबाचा रस
अर्धी वाटी आरारूट पावडर
चवीनुसार मीठ
३ मोठे चमचे मीठ
कृती:
केळी सोलून, देठा-टोकाकडचा भाग कापून घ्यायची.
प्रत्येक केळ्याचे उभे ४ भाग करायचे.
हे सर्व तुकडे एका पसरट भांड्यात घेऊन त्यात एक छोटा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा.
ह्यात भांड भरून उकळते पाणी घालून कमीतकमी १५ मिनिटांसाठी हे काप ह्या पाण्यात राहू द्यायचे.
१५ मिनिटांनी हे काप पाण्यातून काढून घ्यायचे.
आता ह्या तुकड्यांना मीठ, लाल तिखट, मिरी पावडर आणि लिंबाचा रस लावून, नीट पसरवून घ्यायचा.
तव्यात २ मोठे चमचे तेल घालून, तवा मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवायचा.
एका ताटलीत आरारूटची पावडर घ्यायची. आता प्रत्येक काप ह्या आरारूट मध्ये घोळवून तेलात सोडायचा.
सगळे तुकडे ह्याच पद्धतीने तव्यावर टाकून घ्यायचे.
झाकण न लावता, एका बाजूने ५ ते ७ मिनिटे शिजले की परतून दुसऱ्या बाजूनेही होऊ द्यायचे.
राहिलेले १ मोठा चमचा तेल, दुसऱ्या बाजूने परतल्यावर कडेने सोडायचं.
दोन्ही बाजूने छान सोनेरी खरपूस असा रंग आल्यावर काढून, गरमागरम खायला घ्यायचे.
मुरवण्यासाठीचा वेळ: १/२ तास
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
वाढणी: 2 जणांसाठी






Leave a Reply