
नारळी पोर्णिमा म्हटली की ओल्या नारळाची करंजी आणि नारळी भात हे दोन पदार्थ बऱ्याच घरी आवर्जून केले जातात. आमच्या घरी आई लहानपणी थोडे पेढे आणि नारळाची वडीही करून ठेवायची. या दिवसांत शाळा सुरू असल्यामुळे आईला गावाला जाता यायचे नाही. त्यामुळे आईचे भाऊच एक-दोन दिवसांकरता यायचे. त्यांनाही गावाला परतायची घाई असायची, त्यांची शेतीची कामं राहिलेली असायची.
ते गावाला जायला निघाले की त्यांच्यासोबत डबा भरून नारळाच्या वड्या, करंज्या आणि बाकीच्या भावांना राखीही पाठवायची. आम्ही एक आठवडा आधीपासूनच तयारीला लागायचो. आमच्या आवडत्या राख्या आणायच्या. आईचे ब्लाउज आपल्या मापाचे करून घ्यायचे, हट्टाने रक्षाबंधानाच्या दिवशी साडी नेसायची. तेव्हा एव्हढ्या design च्या राख्या नसायच्या. १० रुपयाला ५ आणि अगदी साध्या असतील तर १० ला १० राख्या मिळायच्या. आईने कितीही पेढे, वड्या घरी केल्या असतील तरी आम्ही तिला पटवून काजू कतली आणायला लावायचो.
To Read This ‘Fresh Coconut Puff Karanji’ Recipe in English Click Here.
आता तर २०-२५ वर्षात रक्षाबंधन असे celebrate केलेच नाही. परत लहान होऊन शाळेतले ते दिवस परत जगता आले तर किती मज्जा येईल. शाळेतही कोण कुणाला राखी बांधणार हे आधीच ठरलेलं असायचं. एखाद्या मित्राला आम्ही उगाचच चिडवण्यासाठी त्याला आवडणारी मुलगी त्याला राखी बांधणार अशी अफवा उठवायचो. त्या मुलीला उगाचच मधल्या सुट्टीत राख्या नेऊन द्यायच्या. त्या मित्राला दिसेल असं setting करायचं. एकदा कहर म्हणजे ४ दिवस आमचा एक मित्र शाळेतच आला नाही. आमची मस्ती बाईंच्या कानावर गेली पण आम्ही प्रकरण बऱ्याच प्रयत्य्नाने मिटवले.
आता कोणताही सणासुदीचा दिवस म्हणजे त्या दिवशी केल्या जाणाऱ्या विशेष recipe बनवायच्या आणि आता असेच खाऊन-पिऊन celebration करायचं.
To Read Olya Naralachi Karanji Recipe in English Click Here.
साहित्य:
तळण्यासाठी तेल
सारण बनवण्यासाठी
१ वाटी ओल्या नारळाचा कीस
पाव वाटी गुळ
२ चमचे साखर
१/२ छोटा चमचा वेलची पावडर
४-५ थेंब केशर अर्क
पारीसाठी:
२०० ग्राम (१ मोठी वाटी) मैदा
३० ग्राम (२ मोठे चमचे) तूप
चिमूटभर मीठ
गरजेनूसार पीठ मळण्यासाठी बर्फाचं थंडगार पाणी
कृती
मैदा, तूप आणि मीठ पाणी न घालताच एकत्र करून वाळू सारखं texture येईपर्यंत हाताने एकत्र करावं.
थोडं, थोडं थंड पाणी घालून मऊसर असं पीठ मळून दमट फडक्याने झाकून किमान अर्धा तास तरी बाजूला ठेवावं.
एका नॉनस्टिक भांड्यात सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्यावे. सर्व एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवावं.
अर्ध्या तासाने मध्यम आचेवर हे भांडे ठेऊन, गुळ वितळून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावं.
४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच करंजीत भरण्यासाठी वापरावं.
मळलेल्या गोळ्याचे १२ समान भाग करून, १२ गोळे करून घ्यावे.
एक गोळा घेऊन, पुरीएव्हढा मोठा पण जाडसर लाटावा. त्यात एक मोठा चमचा पुरण मध्यभागी ठेऊन अर्धचंद्राकार दुमडून, कातण फिरवून करंजीचा आकार द्यावा.
कातण नसेल तर काट्याने कडांना design करून घ्यावं.

झालेल्या करंज्या ओलसर कपड्याखाली झाकून ठेवाव्यात.
एका कढईत तेल मध्यम आचेवर गरम करावं. एक, एक करंजी तेलात सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी खरपूस रंगाची होईपर्यंत तळून घावी.
प्रत्येक करंजी तळायला ३ ते ४ मिनटे लागतील.
तयारीसाठी लागणारा वेळ: ५५ मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ: ३५ मिनिटे
वाढणी: ११ करंजी + १ मोदक






Leave a Reply