
भोगी खरतरं इंग्रजी वर्षातील पहिला सण आहे. शहरात राहणारे आपण साधारण मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालून तिळगुळ वाटण्यातच ध्यन्यता मानतो, पण भोगी हा सण खेड्यापाड्यात संक्रांतीच्या आदल्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भोगीच्या दिवशी सडा रांगोळ्या काढल्या जातात. माहेरवाशणी घरी येतात, त्यांच्यासाठी खास गुळपोळ्या केल्या जातात. घरातील सर्वजण गरम पाण्यात तीळ टाकून किंवा तिळाच्या तेलाने अभ्यंग करून स्नान करतात.
या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा खास बेत असतो. हिवाळ्यात तशी भाज्यांची रेलचेल असते. काही भाज्यातर खास हिवाळ्याच्या दिवसांतच मिळतात. घेवडा, हरभरा, बोरं, तुरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा अशा भरपूर भाज्या घालून ही भोगीची भाजी करण्याची प्रथा आहे. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ असं आपल्या पूर्वजांनी म्हटलंच आहे.
ही भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी असते. साधारण तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि खसखस अशा उष्ण पदार्थांचा समावेश ह्या ना त्या प्रकारे ह्या भाजीत केला जातो.
हिवाळ्यात असे अनेक पदार्थ तुम्ही बनवू शकता. खाली मी अश्या लिंक दिल्या आहेत.
मी आज तुम्हांला आमच्याकडे कशा पद्धतीने ही भाजी बनवतात ते दाखवणार आहे. मी शेंगदाणे किंवा खसखस ह्यात वापरलेली नाही. सुख्या खोब्र्यायेवजी ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे.

साहित्य:
२ मोठे चमचे चिंचेचा कोळ
१ मोठा चमचा गुळ
२ मोठे चमचे लाल तिखट
१ मोठा चमचा गोडा मसाला
चवीनुसार मीठ
वाटणासाठी:
अर्धी वाटी ओलं खोबरं
पाव वाटी भाजलेले तीळ
फोडणीसाठी:
२ मोठे चमचे तेल
१ छोटा चमचा जीरे
अर्धा छोटा चमचा हिंग
८-९ कडीपत्त्याची पाने
भाज्या:
पाव किलो घेवडा सोलून, दोन तुकडे करून
अर्धी वाटी सोललेले हरभऱ्याचे दाणे
५-६ काळी काटेरी वांगी मध्ये ४ भागात चीर देऊन
१०-१२ छोटे बटाटे धुवून, चीरा देऊन
१ मोठे रताळे सोलून, मोठ्या तुकड्यात कापून
१ मध्यम कंद धुऊन मोठ्या तुकड्यात कापून
१ मोठं गाजर धुवून, सोलून मोठ्या तुकड्यात कापून
१०-१२ फरसबीच्या शेंगा दोर काढून, २ तुकडे करून
कृती:
खोबरं आणि तीळ बारीक वाटून घ्यावेत.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात फोडणीचे दिलेले साहित्य घालावे.
जीरे तडतडले की घेवडा आणि हरभरे घालावे. थोडेसे मीठ घालून २ मिनटे परतावे.
घेवड्यावर थोडेसे मातकट डाग दिसायला लागले की त्यात राहिलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या.
तेलात सगळ्या भाज्या परतून, थोडंस मीठ आणि पाणी घालून झाकण ठेऊन भाज्या शिजवून घ्यायच्या.
१० ते १२ मिनटात भाज्या शिजल्यावर लाल तिखट, गोडा मसाला आणि वाटलेलं वाटण घालायचं.
थोडं गरम पाणी आणि मीठ घालून सगळं एकत्र करायचं.
एक उकळी आल्यावर त्यात गुळ आणि चिंचेचा कोळ घालायचा.
मीठ, तिखट चवीनुसार adjust करून थोडे पाणी घालून अजून एकदा उकळी येऊन तेलाचा तवंग वर दिसू लागला की gas बंद करायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनटे
वाढणी: ६ जणांसाठी






Leave a Reply