
घारगे चवीला मस्त लागत असले तरी ते बनवणे खूपच कठीण आहे. मला तर ह्या recipe वर पोह्च्याण्यासाठी ४ ते ५ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने करून बघावे लागले. आज्जीने फोनवर साधारण कृती सांगितली पण अचूक प्रमाण सांगण तिला जमत नाही. माझा कधी गुळाचा पाक बनला, कधी गुळ जास्त झाला तर कधी गुळ चिक्कीचा निघाला. गुळ, भोपळा आणि तांदुळाच्या अचूक प्रमाणासोबातच किती गरम करायचं, त्याचं योग्य तापमान आणि कृती मी इथे देत आहे.
लहानपणी आमची आज्जी ह्याचं पीठ भिजवून मुंबईला पाठवायची. ह्या पिठात पाण्याचा अजिबात वापर केला नसल्याने हे बाहेर चांगले राहते. आम्ही ह्याला भोपळ्याची आट काढणे असे म्हणतो.
तुम्हांला लाल भोपळ्याच्या अजून काही गोड recipe वाचायच्या असतील तर खाली लिंक देत आहे.
लाल भोपळ्याचे घारगे बनवताना एकदा तुम्हांला नीट आट काढायला जमली की घारगे मस्त खुसखुशीत आणि चविष्ठ बनतात. काही जण याला गोड घाऱ्या असही म्हणतात. गौरी-गणपती उत्सवात, श्रावण महिन्यात खूप जणांच्या घरी ह्या घाऱ्या आवर्जून केल्या जातात. आमच्यात तेराव्याला किंवा वर्षश्रद्धाला नेवैद्याच्या ताटात वडे-घारगे लागतातातच.
साहित्य:
१ छोटा चमचा साजूक तूप
२ वाट्या किसलेला लाल भोपळा
१ वाटी साधा किसलेला गुळ
सव्वा वाटी गव्हाचे पीठ
पाऊण वाटी तांदुळाचे पीठ
अर्धा छोटा चमचा जायफळ पावडर
अर्धा छोटा चमचा वेलची पूड
चिमुटभर मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
एका कढईत तूप गरम करायचं. त्यात भोपळ्याचा कीस टाकायचा.
२ मिनिटं परतून झाकण ठेऊन शिजू द्यायचा.
झाकण काढल्यावर किसाला पाणी सुटून तो थोडा आळलेला दिसेल.
त्यात गुळ घालून, gas मध्यम करून, गुळ वितळेपर्यंत हे मिश्रण ढवळून घ्यायचे.
ह्या प्रक्रियेत जर गुळ वितळून ह्या मिश्रणात गुळाचा पाक तयार होण्याची प्रक्रिया चालू झाली तर घारगे कडक होतात.
गुळ वितळताच gas बंद करायचा. आता त्यात गव्हाचं आणि तांदुळाच पीठ टाकायचं.
जायफळ पूड, वेलची पूड आणि चिमुटभर मीठ टाकायचं.
आता सगळं एकत्र करून झाकण लावून किमान १५ ते २० मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं.
आता ही उकड थोडी गार झाली की एका परातीत काढून घ्यायची.
थोडासा तेलाचा हात लावून, पाणी न घालता गोळा मळून घ्यायचा.
आता एक-एक लिंबाएव्हढा गोळा घेऊन गोल पुरीच्या आकारात हे घारगे लाटून घ्यायचे.
तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे. गरम तेलात घारगे सोडल्यावर झाऱ्याने त्यावर गरम तेल उडवत राहायचे. असे केल्याने घारगा पुरीसारखा फुलून वर येतो.
असा फुगल्यानंतर, पलटून दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
भिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी (२० ते २२ छोटे नग)






Leave a Reply