झटपट बनणारे गोड पदार्थ मी नेहमीच बनवते. पुरणपोळी, उकडीचे मोदक, खवापोळी खायला रुचकर लागत असले तरी खूप कष्ट घेऊन बनवावे लागतात आणि नेहमीप्रमाणे आपल्या मेहनतीचे फळ दुसऱ्यांना गोड लागते.;)
एकदा आम्ही आईच्या आत्याकडे जेवायला गेलो होतो तेव्हा तिने ही खीर बनवली होती. मला ही खीर एवढी आवडली की मी ही पाककृती तिला विचारून घेतली आणि तेव्हापासून मला जर पटकन कोणता गोड पदार्थ बनवायचा असेल तर शेवयांच्या खीरिऐवजी मी ही खीर बनवते.
दुधी आणि लाल भोपळा घातल्याने ती अधिक पौष्टिक तर होतेच, पण जास्त चवीष्ठही लागते. दोन्हीपैकी एकच भाजी घालून सुद्धा ही खीर खूप छान लागते. नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा.
To read this recipe in English please Click Here.
साहित्य
५०० मिली (अर्धा लि.) दुध
१२५ ग्रॅम (अर्धी वाटी) साखर
२०० ग्रॅम (१ वाटी) दुधी आणि लाल भोपळ्याचा कीस
७-८ बदाम काप करून
५-६ पिस्ते काप करून
१ छोटा चमचा साजुक तूप
१ छोटा चमचा वेलची पावडर
५-६ केशराच्या काड्या
कृती
दुधी-भोपळ्याचा कीस २ शिट्या होईपर्यंत कुकरमध्ये वाफवून घ्यावा.
एका कढईत तूप घालून कढई मध्यम आचेवर ठेवावी.
तूप गरम झाले की त्यात वाफवून घेतलेला कीस घालावा.
छान सुगंध येईपर्यंत कीस २ ते ३ मिनिटे परतावा.
आता दुध घालून एक उकळी येऊ द्यावी.
दुध उकळल्यावर गॅस बारीक करावा, त्यात साखर घालावी.
साखर वितळून खीर एकजीव होईपर्यंत मधून मधून ढवळत रहावी.
५ ते ७ मिनिटांनंतर, सुखा मेवा, केशर आणि वेलची पूड टाकावी.
एकदा ढवळून २ ते ३ मिनिटांनी गॅस बंद करावा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १२ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १७ मिनिटे
वाढणी: ५ जणांसाठी
To read this recipe in English please Click Here.
Leave a Reply