
आज मी तुम्हाला एकदम टेस्टी आणि सोपी अशी कोलंबी भाताची पाककृती सांगणार आहे. हा भात मऊ मोकळा चटपटीत , थोडासा मसालेदार आणि एखाद्या हिरव्या वाटण्याच्या रास्स्यासोबत मस्त लागतो. मला पालक चिकन सोबत हा पुलाव खायला आवडतो.
कोलंबी किंवा चिकन बिर्याणी करायची म्हटली की मसाला करावा लागतो, कांदा तळून घ्यावा लागतो, चिकन मुरवण्यासाठी ठेवावं लागते. ह्यापेक्षा सोपा असा हा प्रोन्ज पुलाव किंवा कोलंबी भात पटकन करता येतो.

एखाद्या दिवशी डब्यात न्यायलाही हा मस्त option आहे. ह्या पुलावासाठी मध्यम किंवा छोट्या आकाराची कोलंबी चांगली लागते. बासमती ऐवजी कोलम किंवा सोना-मसुरी तांदूळ वापरला तरी चालतो.
साहित्य
१५० ग्रॅम (पाऊण वाटी) बासमती तांदूळ
१०० ग्रॅम (अर्धी वाटी) कोलंबी सोलून साफ करून
७५ ग्रॅम (१ मोठा) कांदा सोलून उभा चिरून
४-५ लसून पाकळ्या बारीक चिरून
२ मिरच्या मोठे तुकडे करून
१ छोटा चमचा जीरे
छोटा पाऊण चमचा मीठ
अर्धा छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा बिर्याणी मसाला
१/२ छोटा चमचा गरम मसाला
मुठभर कोथिंबीर धुवून बारीक चिरून
१ लिंबाचा रस
१ बटाटा छोटे तुकडे करून तळून
१ मोठा चमचा तूप किंवा तेल
कृती
तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी उकळून बोटचेपा शिजवून घ्यायचा.
कोलंबी स्वछ धुवून मीठ आणि हळद लावून ठेवायची.
कढईत मोठा चमचा तेल घेऊन, कढई मध्यम आचेवर ठेवायची.
तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, हळद, मिरची आणि लसून घालायची.
लसून परतली की उभा चिरलेला कांदा टाकायचा.
कांदा तांबूस रंगाचा शिजल्यावर कोळंबी घालायची.
दोन मिनटात कोळंबी शिजल्यावर बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालायचा.
एकदा मिक्स करून शिजवलेला भात घालायचा आणि थोडसं मीठ भुर्भूरायचे.
अगदी हलक्या हाताने एकत्र करून झाकण लावून एक वाफ काढायची.
३ टे ४ मिनिटांनी झाकण काढून त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि तळलेले बटाट्याचे तुकडे घालायचे.
तळलेले बटाटे घालणे ऐच्छिक आहे.
आता हलक्या हाताने एकदा मिसळून gas बंद करून पंधरा मिनटे झाकून ठेवायचे.
आता गरम गरम झणझणीत चिकन ग्रेव्ही सोबत खायला घ्यायचं.
मुरवण्यासाठीचा वेळ: १/२ तास
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनटे
वाढणी: 2 जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ८४५.५ Kcal
मेद: २१.८२ ग्रॅम
प्रथिने: ३०.१४ ग्रॅम
कर्बोदके: १३१.८७ ग्रॅम






This prawn dish looks lovely but can you please put up instructions in English? Thanks