सुरणाचे काप
गेल्या काही दिवसांपासून मी संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवते आहे. आतापर्यंत मी कच्च्या केळ्याचे कबाब, कंदाच्या काचरया इथे दाखवल्या आहेत आणि आज सुरणाचे काप.
हे काप बनवण्यासाठी मी मच्छी फ्रायची पाककृती जशीच्या तशी वापरलेली आहे. तुम्ही सुरण आणि मासे हे दोन्हीही खाल्लेले असतील तर तुम्हांला माहीत असेलच की शिजवलेल्या सुरणाची चव बरीचशी माश्याप्रमाणे लागते.
मला वाटते की हेच कारण (चवीचे साध्यर्म) असावे की जेव्हा चातुर्मासात प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य असतात तेव्हा बऱ्याच लोकांच्या आहारात सुरणाचे काप, अळुवडी किंवा मश्रूमचा समावेश होतो.
हा झटपट बनणारा पदार्थ नक्कीच नाही. मी सगळे पदार्थ एकत्र करून त्यात सुरणाचे काप घोळवून फ्रीजमध्ये ठेवते. जेव्ह्या पाहिजे असतील तेव्ह्या काढून, रव्यात घोळवून फ्राय करते. फ्रीजमधे हे काप २-३ दिवस चांगले राहतात.
तुम्हीही हे करून, चाखून पहा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा.
साहित्य
3५० ग्राम सुरण
४-५ चमचे रवा
३-४ चमचे तेल
छोटा चिंचेचा गोळा
मुरवण्यासाठी:
१ छोटा चमचा लाल मिरची पूड
१/२ छोटा चमचा मिक्स मसाला
चिमुटभर हळद
पाव छोटा चमचा मीठ
२ छोटे चमचे तांदुळाचे पीठ
२ छोटे चमचे कोकम आगळ
कृती
हाताला तेल लाऊन, सुरणाची साल काढून लांबट फोडी करून घ्याव्यात.
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अगदी छोटा चिंचेचा गोळा घालून पाणी उकळत ठेवावे.
पाणी उकल्यावर, भांडे आचेवरून उतरून त्यात सुरणाच्या फोडी घालून दोन मिनटे झाकून ठेवावे.
दोन मिनिटांनी ह्या फोडी गरम पाण्यातून काढून बर्फाच्या पाण्यात घालाव्यात.
मुरवण्यासाठी दिलेले साहित्य एकत्र करून एका भांड्यात घ्यावे.
थंड पाण्यातून सुरणाच्या फोडी काढून, हलक्या हाताने कपड्यावर दाबून त्या वरील मिश्रणात एकत्र कराव्यात.
कमीतकमी अर्धा तास मुरण्यासाठी ठेवाव्यात.
अर्ध्या तासाने, जेवढ्या फोडी हव्या असतील तेवढ्या घेऊन त्या रव्यात घोळवून घ्याव्यात.
भीडाच्या तव्यावर तेल घेऊन, मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात रवा लावलेल्या सुरणाच्या फोडी दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस होईपर्यत फ्र्याय कराव्यात.
चटणी आणि गरमागरम चहा सोबत खायला द्याव्यात.
मुरवण्यासाठीचा वेळ: १/२ तास
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनटे
वाढणी: 2-3 जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ५५४.७५ Kcal
मेद: १५.६७ ग्रॅम
प्रथिने: ८.५ ग्रॅम
कर्बोदके: १०२.६५ ग्रॅम






Leave a Reply