मुशीचे कालवण
‘मोरी मासा’ नाव तसं विचित्रच आहे. काही मंडळी ह्याला ‘घोळ’, ‘मुशी’ असेही म्हणतात. नाव काहीही असले तरी मांसाहारी व्यक्तींना चवीशी घेणेदेणे असते, नावाशी नाही.
मच्छी मार्केटमध्ये हल्ली माश्यांचे भाव ऐकले तर सर्वसाधारण माणसाला एक मोठे पापलेट विकत घेणेही आवाक्याच्या बाहेर झाले आहे. परवाचीच गंमत सांगते. ३ मोठ्या पापलेटच्या वाट्यावरून माझी एका कोळणीशी वाटाघाटी चालू होती. ही म्हणाली ८०० रुपयाला देईन, एक पैसाही कमी करणार नाही. मी ६०० रुपयांवर अडून होते. बराचवेळ होय-नाही करून ती ७०० ला तयार झाली. मीही विचार केला १०० रुपयांनी मोठा फरक पडत नाही, घेऊन टाकूया. मी तिला म्हटले की तिघांची तोंड आणि शेपटी कापून मध्यम आकाराचे तुकडे करून दे. हे ऐकताच अक्षरशः माझ्या अंगावर खेकसली. ” मी एकाचे ७०० सांगीतले, तिघांचे नाय. वाट्याचे २००० रुपये. तुला म्हणून दोन हजारात देते, २४०० च्या खाली सकाळपासून एकही वाटा विकला नाही.’
आता तिला काय सांगावे? भाव ऐकून मला भोवळ यायची बाकी होती. मी म्हटले, ‘ताई इतके पैसे तर आत्ता आणले नाहीयेत, आणि हा भाव मला परवडणार नाही.’
तेव्हा मला वाटले की, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात दाखवल्या प्रमाणे, मराठी मध्यमवर्गाला फक्त आता मांदेली, तारली आणि बोंबील खाणेच परवडू शकते. काही दिवसांनी तर फक्त मच्छीचा वास घेणे ही देखील चैनीची गोष्ट होऊन बसेल.
असो, तर त्या कोळणीकरून परत वाटाघाटी करून, नीट २-३ वेळा भावाची खात्री करून मी १४० रुपयांना हे दोन घोळ मासे विकत घेतले. ह्या माश्याना एक उग्र असा दर्प असतो, त्यामुळे ह्यांना अक्खा गरम मसाला वापरून शिजवावे.
मुशीचे कालवण मालवणी पद्धतीचे
साहित्य
२५० ग्रॅम (२ छोटे) साफ करून मध्यम आकारात कापलेले घोळ मासे
२ मोठे चमचे तेल
3-4 कोकम
½ छोटा चमचा मीठ
फोडणीसाठी
४-५ लवंग
६-७ काळी मिरी
१ तुकडा दालचिनी
२-३ हिरवी वेलची
१-२ हिरव्या मिरच्या
सुखे मसाले
½ छोटा चमचा हळद
¾ छोटा चमचा लाल तिखट
१ छोटा चमचा मालवणी मसाला
वाटणासाठी
१ मोठा कांदा पातळ काप करून
¼ कप ओल्या नारळाचा चव
४-५ सुख्या लाल मिरच्या
१०-१२ लसूण पाकळ्या
छोटासा आल्याचा तुकडा

कृती
प्रथम कढईत १ चमचा तेल घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे.
तेल गरम झाले की त्यात वाटणासाठी चिरलेला कांदा टाकावा.
कांदा चांगला खरपूस रंगाचा होईपर्यंत ५ ते ७ मिनिटे परतावा.
त्यात सुख्या लाल मिरच्या, लसूण व आलं टाकून २ मिनिटे भाजावे.
सर्वात शेवटी खवलेला ओला नारळ टाकावा.
नारळ मातकट रंगाचा झाला की मिश्रण गॅसवरून उतरून थंड होऊ द्यावे.
थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
कढईत परत १ चमचा तेल घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे.
तेल तापले की त्यात वर फोडणीसाठी नमूद केलेले साहित्य टाकावे.
त्यात वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतावे.

कडेने तेल सुटल्याचे दिसू लागताच वर नमूद केलेले सुखे मसाले आणि कोकम घालावे.
१ वाटी पाणी टाकून रस्स्याला एक उकळी येऊ द्यावी.

आता ह्यात माश्याचे तुकडे आणि मीठ टाकावं. १ ते २ मिनिटे बारीक गॅस करून शिजू द्यावं.
गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भाता बरोबर वाढावं.
एकूण वेळ: ३५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ६९९.११ Kcal
मेद: ४४.०५ ग्रॅम
प्रथिने: ५१.६३ ग्रॅम
कर्बोदके: ३८.१२ ग्रॅम






Nice आनखी रेसेपी सांगा