
पांढरे शुभ्र जाळीदार घावन आणि त्यासोबत नारळाचा गोड रस. असे अप्रतीम combination जर सकाळी सकाळी नाश्त्याला मिळाले आणि तेही आयते आज्जीच्या हातचे तर मी नक्कीच स्वप्नात असते. आमच्या गावाला असे वेळखाऊ पदार्थ सकाळच्या वेळी कधीच बनत नाहीत.
आमच्या आजोळी घरीच चक्की असल्याने, आज्जी घावन, आंबोळी, भाजणी अशी पीठे नेहमीच ready ठेवते. मी मात्र घावन बनवण्यासाठी रात्री तांदूळ भिजत टाकते आणि सकाळी वाटून घावन बनवते.
असंच एका दिवशी मी रात्री तांदूळ भिजत ठेवले आणि अचानक माझी बहिण रात्री माझ्याकडे राहिला आली. आम्हाला गप्पांच्या नादात मध्यरात्र उलटून गेल्याचे कळलेही नाही. सकाळी उठून मी जाहीर केलं की आज मी नाश्त्याला रस-घावन बनवणार आहे. तांदूळ वाटायला घेतल्यावर लक्षात आलं की हे ३ जणांसाठी पुरेसे पीठ होणारं नाही. मग विचार केला की थोडं तांदुळाच पीठ घालावं वाटताना, पण तेही संपलेलं होत. फ्रीजमध्ये वाटीभर उरलेला भात होता. तोचं वाटला तांदुळासोबत आणि काय नवीन शोध लागला म्हणून सांगू……मस्त जाळीदार, लुसलुशीत, पांढरे शुभ्र घावन.

त्या आधी घावन बनवताना चांगली जाळी पडत नसे आणि खूप पातळ केले तर त्याला छोट्या-छोट्या चीरा जात असत, पण जर चांगला जुना तांदूळ घेतला आणि थोड्याश्या शिजलेल्या थंड भातासोबत वाटला तर result म्हणजे अप्रतीम अशा texture चे घावन तय्यार. तुम्हीही जरूर हे try करून बघा. आता तर घावन बनवायचे असतील तेव्हा special थोडा भात जास्त करून रात्री फीजमध्ये ठेवते किंवा रात्री भात उरला तर दुसऱ्या दिवशी घावनाचा बेत करते.
घावनासोबत रस बनवायचा असेल तर मी नारळाचं दुध जे readymade मिळते ते वापरते. ह्या मुळे वेळ वाचतो आणि सकाळच्या वेळी नारळ फोडणे, तो खरवडणे, खोबरं वाटणे, त्याचे दुध काढणे या सगळ्या कटकटीपासून सुटका होते. तयार नारळाच्या दुधात, गायीचं दूध, चिमुटभर जायफळ पावडर आणि चवीनुसार गुळ घालून मंद gas वर गुळ वितळेपर्यंत गरम करते. मला kara कंपनीचं दूध वापरायला आवडते.
साहित्य:
२५० ग्राम जुने तांदूळ
१ मोठी वाटी शिजलेला थंड भात
चवीपुरता मीठ
२ चमचे तेल तव्याला लावण्यासाठी
कृती:
तांदूळ २ ते ३ पाण्यातून धुवून कमीतकमी ४ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवायचे.
mixer च्या मोठ्या भांड्यात पाण्यातून उपसून हे तांदूळ घ्यायचे. त्यात शिजलेला भात घालून अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं.
हे वाटलेलं तांदुळाचे मिश्रण एका मोठ्या वाडग्यात घेऊन त्यात चवीपुरता मीठ घालायचं.
आता पुरेसं पाणी घालून हे पीठ पातळ करून घ्यायचं.
बिडाचा तवा गरम करायला ठेवायचा. तव्याला थोडंस तेल लावून सुती फडक्याने पुसून घ्यायचं.
प्रत्येक वेळी घावन घालताना पीठ एकदा तळापासून नीट ढवळून घ्यायचं.
आता मोठा gas ठेऊनच तव्यावर घावन पसरून घ्यायचं. १० ते १५ सेकन्दांसाठी झाकण ठेवायचं.
gas बारीक करून, घावन ताव्यापासून सोडवून एखाद्या बांबूच्या टोपलीवर काढून घ्यायचं.
थंड झालं की चौकडी करून ताटात ठेवायचं. अशाच तऱ्हेने सर्व घावन करून घ्यायचे.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
भिजण्यासाठी लागणारा वेळ: ४ तास
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३५ मिनटे
वाढणी: २-३जणांसाठी (९ ते १० मोठे नग)







Leave a Reply