
सकाळच्या घाई-गडबडीत नाश्त्याला अश्या सोप्या केळ्याच्या पुऱ्या बनवून वेळ मारून नेता येईल. ह्या पुऱ्या बनवायला अगदी सोप्या आहेत. मस्त गोड, खुसखुशित आणि आतून थोडं भटूरयाच्या texture च्या लागतात. याशियाय तुम्ही ह्या आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवल्या तरी पुढचे २ दिवस पुरवून पुरवून खाऊ शकता. पण चवीला ह्या एव्हढ्या addictive असतात की दोन दिवस उरणार नाहीत.
खरंतर ह्या recipeचा उगम हा ‘manglore buns‘ च्या recipe वरून झाला आहे. आमच्या शेजारी शेट्टी आंटी राहायच्या. त्या नेहमी आम्हांला हे buns पाठवायच्या. एकदा-दोनदा आमच्या आईला आम्ही त्यांच्याकडे पाठवले की तू शिकून ये, हे buns कसे बनवायचे ते. आईही करायची शिकल्यानंतर पण शेट्टीआंटी सारखी taste आणि texture दोन्ही खूपच कमी वेळा जमून यायचं.
त्या सढळ हस्ते मैदा, साखर याचा वापर करायच्या. मला पण हे buns बनवायला लागणारा patience अजून प्राप्त झाला नाहीए. रात्रभर हे पीठ भीजवून, बाहेर ठेवल्यावर सकाळी खूप पातळ होते, आणि त्यात सकाळी पीठ वाढवले की त्यातला साखरेचा गोडवा कमी होतो. ह्यावर उपाय म्हणून मी ही झटपट recipe तयार केली आहे. मैद्याऐवजी मी ह्यात गव्हाचे पीठ(wheat flour) वापरले आहे आणि buns जे आतून texture असतं ते येण्यासाठी दही आणि खाण्याचा चिमुटभर सोडा वापरला आहे.
अशाच झटपट पुऱ्या किंवा २-३ दिवस टिकणारे नाश्त्याचे पदार्थ बघायचे असतील तर खाली click करा.
आता पटकन मी तुम्हांला या केळ्याच्या पुर्यांचे साहित्य आणि कृती सांगते.
साहित्य:
२५० gm गव्हाचं पीठ
तळण्यासाठी तेल
पेस्ट करण्यासाठी:
२ अति पिकलेली केळी
अर्धी वाटी साखर
पाव वाटी दही
पाव छोटा चमचा वेलची पावडर
अर्धा छोटा चमचा जायफळ पावडर
पाव छोटा चमचा मीठ
चिमुटभर खाण्याचा सोडा
कृती:
वर दिलेले पेस्ट करण्यासाठीचे सगळे पदार्थ मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊन ३० ते ४० सेकंदासाठी फिरवून घ्यायचे.
आता एका परातीत ही पेस्ट काढून त्यात गव्हाचे पीठ मिसळून पीठ भिजवायचे.
अजिबात पाणी घालायचे नाही. पुरीसाठी भिजवतो तेव्हढाच घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा.
चांगला मळला की थोडा तेलाचा हात लावून झाकून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवायचा.
कढईत तेल घेऊन, कढई मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवायची.
आता मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या.
लाटताना चिकट वाटल्या तर तेलावर लाटायच्या.
आता एक-एक तेलात सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्याचया.
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी(२४-२५ मध्यम आकाराचे नग)

This recipes, really delicious