ह्या पदार्थाला नक्की धिरडी, डोसे का घावन म्हणायचे ते तुम्ही ठरवा. हे पूर्ण पोटभरीचे खाणे आहे. तुम्ही न्याहरी किंवा अगदी रात्रीच्या जेवणासाठीही ही धिरडी बनवू शकता. मेथी घातल्यामुळे ही धिरडी चवीला अतिशय चटपटीत लागतात आणि मेथीसारखी कडू भाजीही पोटात जाते.
मी ब्राऊन राईस दळून आणला होता म्हणून मी ते पीठ वापरले आहे, पण साधे तांदूळ पीठ वापरूनही ही धिरडी छान होतात. माझ्या अनुभवाप्रमाणे बीडाच्या तव्यावर ही धिरडी रवा डोस्याप्रमाणे कुरकुरीत होतात. nonstick तव्यावर घावनासारखे होतात.
ज्वारीचे पीठ घातल्यामुळे ह्या पदार्थांचे पोषणमूल्य वाढते. अर्थात थंडीत बाजरीचे पीठ आणि उन्हाळ्यात नाचणीचे पीठ ज्वारीऐवजी घालूनही ही धिरडी करता येतात.
खाली दिलेल्या साहित्यात ६ धिरडी बनतील. तुम्हीही ही ज्वारी मेथीची धिरडी करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा.
साहित्य
१ वाटी (१०० ग्राम) ज्वारीचे पीठ
१ वाटी (५० ग्राम) मेथीची पाने धुऊन, बारीक चिरून
अर्धी वाटी (५० ग्राम) तांदूळ पीठ
पाव चमचा हळद
अर्धा चमचा जीरे
१ मिरची बारीक कापून
१ चमचा मीठ
२ छोटे चमचे तेल
उकळत पाणी आवश्यक्तेनुसार
कृती
एका मोठ्या भांड्यात तेल वगळून सर्व साहित्य घ्यावे.
whisk णे किंवा चमच्याने सर्व साहित्य एकत्र सुखेच मिसळून घ्यावे.
आता हयात उकळते पाणी थोडे थोडे घालून रव्या डोस्याप्रमाणे पीठ सारखे करून घ्यावे.
पीठ खूप घट्ट किंवा नीर डोस्याप्रमाणे अगदी पातळ करू नये.
आता तवा गरम करून घ्यावा. त्यावर २-३ थेंब तेल सोडून हे पीठ चांगले ढवळून डोस्याप्र्माणे पसरून घ्यावे.
दोन-तीन मिनटे झाकण ठेऊन एका बाजूने होऊ द्यावे.
आता झाकण काढून, धिरडे परतून दुसया बाजूनेही शिजवून घ्यावे.
गरमागरम नारळाच्या चटणी सोबत खायला द्यावे.

तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३५ मिनटे
वाढणी: २ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ६२३.५ Kcal
मेद: ११ ग्रॅम
प्रथिने: १७.१५ ग्रॅम
कर्बोदके: ११७.९५ ग्रॅम






Leave a Reply