
हिरव्या वाटणातील कोलंबी रस्सा
मासेखाऊ लोकांच्या मनात कोलंबीला एक वेगळे स्थान असते. प्रत्येक मस्यप्रेमीची आवडीची अशी कोलंबीची एखादी डिश तर असतेच, मग ती कोलंबी भात असो की कोलंबीचा रस्सा.
ही हिरव्या वाटणातील कोलंबी मस्त टेस्टी तर लागतेच शिवाय हा हिरवा मसाला एकदा वाटला की पापलेट, सुरमई किंवा मोद्क अशा माश्यांसाठीही वापरता येतो. गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत हा मस्तच लागतो. जर तुम्हांला नारळाचे दुध घालायचं नसेल तर तुम्ही थोडासा ओलं खोबरं ह्या वाटणासोबतच वाटा. ते सोप्प आहे. ह्याची recipe इथे दिली आहे.
कोलंबीचे अजून वेगवेगळे प्रकार तुम्हांला बघायचे असतील तर खाली लिंक दिल्या आहेत.
हा रस्सा हिरवागार होण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत त्याचा जरूर वापर करा.
१. वाटण करताना त्यात लिंब, टोमाटो किंवा चिंच वापरू नका. कच्ची कैरी वापरली तर चालेल.
२. शिजवताना झाकण ठेवून शिजवू नका.
३. कोथिंबीर आणि कडीपत्त्याचा वापर जास्त करा.
आता आपण हे हिरवे झिंगा कालवण कसं बनवायचं ते बघूया.

साहित्य
२५० ग्राम साफ केलेली कोलंबी
१ छोटा कांदा सोलून बारीक चिरून
१ मोठा चमचा मालवणी मसाला
२ मोठ्या वाट्या नारळाचे दूध
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी
१ मोठा चमचा तेल
१ छोटा चमचा जीरे
पाव चमचा हळद
५-६ लवंग
५-६ काळीमिरी
१ मोठी वेलची
हिरव्या वाटणासाठी
१ जुडी पुदिना
१ जुडी कोथिंबीर
२-३ काड्या कडीपत्ता
२-३ मिरच्या
७-८ लसूण पाकळ्या
१ इंच आलं
कृती
कोलंबी साफ करून मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवायची.
वर दिलेल्या वाटणासाठीच्या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात घेऊन अगदी कमीतकमी पाणी घालून वाटून घ्यायचे.
आता एका कढईत तेल गरम करायचं.
तेल गरम झाल्यावर वर दिलेले सर्व फोडणीचे साहित्य टाकायचं.
जीरे तडतडले की बारीक चिरलेला कांदा टाकायचा. थोडसं मीठ टाकायचं.
कांदा शिजला की ३ मोठे चमचे हिरवे वाटण घालायचं.
वाटण शिजेपर्यंत परतत राहायचं. ५ ते ७ मिनिटांत मसाला शिजेल.
आता त्यात कोलंबी घालायची. कोलंबी एकत्र परतली की मालवणी मसाला घालायचा.
आता दोन वाट्या नारळाच दुध घालून सर्व मस्त एकत्र करायचं.
चवीनुसार मीठ टाकून मंद gasवर एक उकळी येऊ द्यायची.
आता gas बंद करून गरमागरम वाढायचं.
तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १२ मिनटे
वाढणी: ३ जणांसाठी






Leave a Reply