आमरस बनवायची अशी काही विशेष पाककृती नाही. प्रत्येकजण स्वतःला करायला जी सोपी वाटेल अशा पध्दतीने आमरस बनवतो. आज मी मला आवडणाऱ्या आमरसाची बनवण्याची पद्धत इथे नमूद करत आहे. ही पद्धत आमच्या घरी परंपरेनुसार चालत आलेली आहे.
आजकाल बहुतेकजण आमरस हा मिक्सरमध्ये बनवतात. त्यात केशर, मलई आणि वेलची पूडसुद्धा टाकतात. आमच्याकडे मात्र आमरसात चवीपुरती साखर(जरूर वाटल्यास), मीठ, थोडेसे दुध आणि भरपूर साजुक तूप टाकून खाण्याची पद्धत आहे. ह्या रितीने आमरस बनवल्याने तो पोटाला बाधत नाही आणि उष्णही पडत नाही.
पायरी आणि हापूस आंबे असे दोन प्रकार रस काढण्यासाठी वापरले तर रस फारच मधुर चवीचा बनतो. माझ्या आईलातर फक्त पायरी आंब्यांचा रस आवडतो.
आमरस करण्याआधी आंबे किमान अर्धा तास स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत. अर्ध्या तासाने पाण्यात आंबे स्वच्छ धुवून, वरचा देठाकडचा भाग हाताने काढून, देठाकडील भागातला थोडा रस पाण्यात पिळून घेऊन, आंबे रस काढण्यासाठी तयार ठेवावेत.
साहित्य
६ पिकलेले आंबे (धुऊन, देठाकडून पिळून)
२ चमचे साखर ( आंबे चवीला आंबट असतील तरच)
चिमुटभर मीठ
अर्धा वाटी दुध
कृती
आंबे हाताने अख्खे सोलून कोय आणि साली वेगळ्या कराव्यात.
सर्व कोई हाताने पिळून, सर्व गर पातेल्यात जमा करावा.
अखंड साल, उलटी करून (रसाचा भाग) बहेरील बाजूस) घ्यावा.
आता ह्या सालीसुद्धा हाताने घट्ट पिळून घ्याव्यात.
ही पुढील कृती ऐच्छिक आहे.
पिळलेल्या साली आणि कोई अर्धा कप दुधात एकेक करून बुडवून त्या दुधाच्या साह्याने पिळून घाव्यात.
हे दुध आता आमरसात मिसळावे.
चवीपुरती साखर आणि किंचित मीठ घालावे.
आता हा आमरस रवीने घुसळून किंवा पुरणयंत्रातून घोटून घ्यावा.
मी whisk च्या साह्याने घुसळून घेतला आहे.
आता हा आमरस वाटीत भरून, वरून तुपाची धार सोडून, गरमागरम पुरीसोबत खायला घ्यावा.
तयारीसाठी लागणारा वेळ: ५० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ०० मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ३७० Kcal
मेद: २ ग्रॅम
प्रथिने: ३ ग्रॅम
कर्बोदके: ८४.५ ग्रॅम






Leave a Reply