
मेथीचे ठेपले
मेथी खूप लोकांच्या घरात फक्त ठेपले बनवण्यासाठीच आणली जाते. प्रत्येक घरात आपापली अशी ठेपले बनवण्याची कृती ठरलेली असते. मी सुद्धा सकाळच्या घाईच्या वेळी हे मेथीचे ठेपले झटपट कसे बनवते ते तुम्हाला सांगणार आहे.
ही गुजराती समाजात बनवतात तशी पारंपारिक पाककृती नाही. हे माझे पौष्टिक नाश्ता बनवण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. मी पूर्णपणे गव्हाचे पीठ वापरलेले आहे. तुम्ही ह्याला मेथीचा पराठा ही म्हणू शकता.

मेथी बाजारातून आणली की निवडून, धुवून एका सुती फडक्यावर टाकून पूर्णपणे सुकवून घ्यायची. आता ही सुकलेली पाने एका फडक्यात गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत फ्रीज मध्ये ठेवायची. अशी निवडलेली, स्वछ पान आठ दिवस खराब होत नाहीत. घाईच्या वेळेला तुम्ही थोडीशी काढून चिरून भाजी, आमटीत वापरू शकता. ज्वारी मेथीची धिरडी सुद्धा मस्त होतात.
साहित्य
२ मोठे चमचे तूप
१/२ छोटा चमचा तेल
कणिक भिजवण्यासाठी
दिड वाटी गव्ह्याचे पीठ
अर्धी वाटी धुवून, सुकवून बारीक चिरलेली मेथीची पाने
१ छोटा चमचा लाल तिखट
१ छोटा चमचा मीठ
पाव छोटा चमचा हळद
अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पूड
१ छोटा चमचा धने पूड
१ छोटा चमचा पिठी साखर
कृती
एका मोठ्या परातीत कणिक भिजवण्यासाठी वर दिलेले सर्व साहित्य घेणे.
थोडे-थोडे पाणी घालून पोळ्यांना मळतो तशी मऊसर कणिक मळून घ्यावी.
अर्धा चमचा तेल कणकेच्या गोळ्याला लाऊन अजून दोन मिनटे मळावे.
आता हा चांगला मळलेला कणकेचा गोळा कमीतकमी १५ मिनटे झाकून ठेवावा.
आता ह्या गोळ्याचे ९ सारखे भाग करून घ्यावे.
आता एकेक करून ह्या मेथीच्या पोळ्या लाटून तूप लावून गरम तव्यावर खरपूस भाजाव्यात.
गरमागरम ठेपले, रायत्यासोबत खायला द्यावे.
एकूण वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी






Leave a Reply