
ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी
थंडीची चाहूल लागताच तुरीच्या शेंगा मुबलक प्रमाणात बाजारात मिळायला लागतात. पालेभाज्या सुद्धा मस्त हिरव्यागार यायला लागतात. थंडीत माझ्या मते डायट वैगेरे बाजूला ठेऊन मस्त फळ आणि भाज्यांवर ताव मारायला हवा.
कितीतरी प्रकारच्या भाज्या केवळ थंडीच्या दिवसांतच बनतात. तुरीच्या शेंगांची आमटी, पोपटी, मेथी-मलई, उन्धीयू किंवा मटरची उसळ. तुमच्याकडे थंडीच्या दिवसांत कोणत्या special भाज्या बनतात हे मला नक्की कळवा.
तुरीच्या शेंगा सोलून त्याचे दाणे वेगळे करायचा मला प्रचंड कंटाळा येतो. एक तर ते खूप वेळ खाऊ काम आहे आणि सोलताना हाताला चिकट आणि काळपटपणा येतो. पण आता हे सोललेले दाणे बाजारात मिळतात आणि आपले काम सोप्पे होते.
हे लाल वाटण करून घेतले की त्यातून veg लोकांसाठी ही आमटी केली तर non-veg खाणाऱ्यांसाठी मस्त लाल रस्स्यातील chicken तयार होते.
साहित्य
१ वाटी सोललेले ओल्या तुरीचे दाणे
२ मोठे चमचे तेल
१ मोठा चमचा कोकम आगळ
मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
१ छोटा चमचा मालवणी मसाला
१ छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट
अर्धा छोटा चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी
अर्धा छोटा चमचा मोहरी
पाव छोटा चमचा हळद
४-५ काळी मिरी
२-३ लवंगा
१ काळी वेलची जराशी कुटून
वाटणासाठी
१ छोटा कांदा सोलून, उभा चिरून
अर्धी वाटी ओले खोबरे
४-५ अक्खे काजू
३-४ लाल काश्मिरी मिरच्या
७-८ लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं

कृती
एका कुकरमध्ये १ मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं.
तेल गरम झालं की त्यात कापलेला कांदा, आलं आणि लसून घालायची.
gas मध्यम आचेवर ठेऊन कांदा चांगला मातकट रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा.
आता त्यात सुख्या लाल मिरच्या, ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि काजू टाकायचे.
खोबरे लाल झालं की gas बंद करायचा.
हा मसाला थंड झाला की थोडसं पाणी घालून वाटून घ्यायचा.
परत त्याच कुकरमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं. त्यात फोडणीसाठी दिलेले सर्व साहित्य टाकायचं.
मोहरी तडतडली की तुरीचे दाणे घालायचे. थोडेसे मीठ घालायचं.
दोन ते तीन मिनटे हे दाणे तेलात परतायचे. आता तीन ते चार चमचे वाटलेला लाल मसाला घालायचा.
थोडासा हा मसाला तेलात परतून दोन भांडी पाणी टाकायचं.
चवीनुसार मीठ टाकून एक उकळी येऊ द्यायची.
उकळी आल्यावर एक छोटा चमचा मालवणी मसाला आणि लाल तिखट टाकायचं.
एकदा सगळं एकत्र करून कुकरच झाकण लावायचं.
एक शिट्टी झाल्यावर, मंद gasवर ५ ते ७ मिनिटे शिजवून gas बंद करायचा.
सगळी वाफ गेल्यावर परत कुकर उघडून मंद gas वर ठेवायचा.
आता जेवढी पातळ आमटी हवी असेल तेवढ पाणी वाढवायचं.
एक मोठा चमचा कोकम आगळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
थोडासा गरम मसाला टाकून gas बंद करायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी

Leave a Reply