
गरमागरम हिरव्या गार पालक पुऱ्या कुणाला आवडत नाहीत? आमच्या घरी कुणी पाहुणे राहायला येणार असतील तर मी आदल्या दिवशीच हे पीठ भिजवून ठेवते. दुसर्या दिवशी किचनमध्ये अजिबात वेळ न दवडता मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या चहासोबत तयार.
ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत शिवाय खूप वेळ फुगलेल्या राहतात. तुम्हांला ह्या मागचं राज जाणून घ्यायचं असेल तर हे माझं पुराण शेवटपर्यंत वाचा किंवा हा video बघा.
पालकाची पेस्ट करण्यासाठी, पालकाची पाने स्वच्छ धुवून, २ मिनटे उकळत्या पाण्यात शिजवून लगेचच बर्फाच्या पाण्यात टाकायची. बर्फाच्या पाण्यातून गाळून, थोडीशी घट्ट पिळून त्याची पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट काचेच्या डब्यात भरून फ्रीजमधे ठेवली तर आठ दिवस चांगली राहते.
ही पेस्ट वापरून पालकाचे पराठे, पालक चीझ पराठे किंवा पालकाचे तिखट शंकरपाळे ही मस्त होतात.

पुरीसाठी पीठ भिजवताना पीठ अजिबात मळायचे नाही. हे पीठ अतिशय घट्ट ठेवायचे. सगळे जिन्नस एकत्र येण्यापुरते, अगदी थोडेसे पाणी घालून हे पीठ भिजवायचे. हे भिजवलेले पीठ २ ते ३ दिवस फ्रीजमध्ये टिकते.
हे भिजवलेले पीठ थोडे घट्ट असल्यामुळे गोळे करायला किंवा लाटायला थोडे जड जाते, तेव्हा थोडा तेलाचा हाथ लावून, थोडा जोर लावून हे गोळे करायचे. सगळ्या पुऱ्या तेलावरच लाटून घ्यायच्या. अजिबात सुखं पीठ लावायचं नाही. तळतानाही खूप गरम तेलात पुऱ्या तळायच्या. तेल थंड असेल किंवा अगदी कडकडीत गरम असेल तर पुऱ्या तेल पितात्त आणि फुगतही नाहीत.
तुम्ही या सर्व trick वापरून पुऱ्या करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. तुमच्या पुऱ्या कशा झाल्या तेही सांगायला विसरू नका. अशाच नवीन recipichya अपडेटसाठी subscribe करा.
साहित्य
तळण्यासाठी तेल
कणिक मळण्यासाठी:
अर्धी वाटी पालकाची पेस्ट
दिड वाटी ग्व्ह्याचे पीठ
पाव वाटी मैदा
१ मोठा चमचा रवा
अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पूड
१ छोटा चमचा धणे पूड
पाव छोटा चमचा मिरी पूड
१.५ मोठा चमचा आलं – मिरची वाटण
चवीनुसार मीठ
१ छोटा चमचा पिठी साखर
कृती
वरील दिलेले कणिक मळण्यासाठीचे सर्व साहित्य एका परातीत घ्यावे.
आवश्यकता लागल्यास अतिशय थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.
तेल गरम करण्यास ठेवावे.
तयार पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
आता सर्व पुऱ्या तेलाचा हात लावून लाटून घ्याव्यात.
गरम तेलात पुरी सोडून, ती फुगून वर आली की पालटावी.
दुसऱ्या बाजूनेही २० ते ३० सेकंदच तळून बाहेर काढावी.
अशाच तऱ्हेने सगळ्या पुऱ्या तळून घ्याव्यात.
तयारीसाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी






Leave a Reply