
पातळ पोह्यांचा चिवडा
दिवाळी येण्याची चाहूल लागायची ती सहामाही परीक्षा सुरु झाल्यावर आणि घरी आल्यावर भाजाणीचा खुसखुशीत सुवास आणि चिवड्याची चव बघायला आई थोडासा द्यायची त्यावरून.
चिवडा हा दिवाळीचा पदार्थ सगळ्यात आधी बनवला जायचा. देण्याघेण्यासाठी डब्यात भरून झाला की दिवाळीच्या आसपास परत एकदा बनवला जाई. हा चिवडा बनवायला अगदी सोप्पा आणि चविष्ठ. एकदा तोंडाला चव लागली की रोज दुपारी हाच असायचा चहाचा सोबती अगदी देवदिवाळीपर्यंत.
आता काय वर्षातून कधीही बनवतो आपण. खास दिवाळी फराळ अशी काही खासियत राहिली नाही ह्या चिवड्याची. आता तर diet food म्हणून हा बाजारात मान उंच करून आहे. मलाही हा चिवडा थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू पिळून आवडतो. तसा माझा favourite आहे तळलेल्या पोह्यांचा चिवडा किंवा लसूण चिवडा.
हा चिवडा करताना पोहे २ ते ३ तास उन्हांत वाळवून घेतले की ते फोडणीला घातल्यावर आळत नाहीत. ही एक महत्वाची tip आचरणात आणली की मस्त कुरकुरीत, कमी तेलात हा चिवडा तयार होतो.
दिवाळी साठी जर अजून फराळ बनवायचा असेल तर खाली लिंक दिल्या आहेत.
साहित्य
२०० ग्राम (३ वाट्या) पातळ पोहे
७५ ग्राम (अर्धी वाटी) कच्चे शेंगदाणे
२५ ग्राम (पाव वाटी) सुख्या खोबऱ्याचे काप
२५ ग्राम ( १ मोठा चमचा) काजूचे तुकडे
१५ ग्राम (पाव वाटी) फुटाणा डाळ
१५ ग्राम (१ मोठा चमचा) पिठी साखर
४-५ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
१ छोटा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पूड
१ छोटा चमचा आमचूर पावडर
अर्धा छोटा चमचा हळद
१५-२० कढीपत्ता पाने
३ मोठे चमचे तेल
चवीनुसार मीठ
कृती
पातळ पोहे २ ते ३ तास उन्हांत ठेवावेत.
आता हे पोहे कढईत काढून मध्यम आचेवर कुर्कुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत.
आता हे पोहे कढईतून काढून त्याच कढईत तेल गरम करण्यास ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात हळद, कढीपत्ता आणि शेंगदाणे घालावे.
२ ते ३ मिनटे परतल्यावर त्यात सुखे खोबरे आणि फुटाणा डाळ घालायची.
सुख्या खोबऱ्याचे काप खरपूस तांबूस होईपर्यंत तळायचे.
आता काजूचे तुकडे घालून अर्धा मिनटे परतायचे.
काजूच्या तुकड्यांना सोनेरी रंग आला की भाजलेले पोहे, वर दिलेले मसाले आणि मीठ घालायचे.
अतिशय हलक्या हातांनी, काविलथा घेऊन हा चिवडा मिक्स करायचा.
पोहे कुरकुरीत असल्याने, जोरजोरात ढवळल्यास भुगा होईल.
आता हा चिवडा थंड झाल्यावर डबा बंद डब्यात भरून ठेवायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
पोहे वाळवण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १८ मिनटे
वाढणी: ४ मोठ्या वाटी भरून






Leave a Reply