अंगारखी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही.
साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, साबुदाणा खिचडीवरून आठवली म्हणून सांगतेय. मी लग्न होईपर्यंत कधीही काहीही जेवण बनवले न्हवते. सगळे आयते करून मिळायचे, खूपदा वाढून सुद्धा मिळायचे. (आईचे प्रेम). 🙂 सांगायचा मुद्दा असा की वयाच्या बावीस वर्षान्पर्यंत काय, कसे, किती आणि कधी बनवायचे ह्यातले काहीही माहिती नव्हते.
अशा वेळी माझा एक मित्र स्वतःच्या आईशी भांडण करून दुपारी तीन वाजता माझ्या घरी आला. माझी आईही घरात नव्हती. त्याची करूण कहाणी ऐकली…कळले की त्याचे प्रेमप्रकरण त्याच्या आईला अजीबात मान्य नव्हते. दोन दिवसांपासून महाराज जेवलेही नव्हते. अचानक बोलताबोलता मला म्हणाला…कशी मैत्रीण आहेस…..माझ्या गोष्टीत जास्त intrest आहे तूला…मला काही खायला देशील की नाही…
मी म्हटले…चहा दिला असता पण मी केलेला चहा मी सुद्धा पीत नाही…बाकी काही मला बनवायला येतच नाही….फ्रीजमध्ये काही आहे का ते बघते……आणि फ्रीज मध्ये एका वाटीत थोडी साबुदाणा खिचडी होती. मी म्हटले…की थोडी गरम करून देते…तो म्हणाला…दे अशीच….खातो पटकन…खूप भूक लागली आहे. मीही लगेच तशीच थंड वाटी आणि चमचा दिला. नाहीतरी…..ती थोडीशी खिचडी कशी गरम करायची ह्या बद्दल माझ्या मनात हजार शंका होत्याच…
आता वेगळे सांगायला नकोच..की खाताना त्याने मला शिव्यांची लाखोली व्हायली. अशी चांबट खिचडी खाताना त्याचे दात आणि एकूणच संपूर्ण तोंड दुखू लागले. आणि साबुदाणा खिचडीच्या निमित्ताने का होईना आम्हा दोघांनाही आपापल्या आईचे महत्व पटले.
असो…तर…एक धडा असा आहे…की फ्रीज मधली साबुदाणा खिचडी खायला घेताना वाफेवर गरम करावी. मोदकपात्रात किंवा कूकरला शिट्टी न लावता, त्यात खाली पाणी घालून त्यावर खिचडीचे भांडे ठेउन वाफ काढावी.
साबुदाणा खिचडी करणे म्हणजे एक कला आहे…प्रत्येकाच्या हातची खिचडी ही खाणेबल असेलच अस नाही.
माझी आई साबुदाणा भिजवताना…एकदा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. 5० मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे. आता माझी बडबड खूप झाली आता जाऊया पाककृतीकडे…
To read this recipe in English please Click Here ‘Sabudana Khichdi Recipe‘.
उपासासाठी रताळ्याचे काप कसे करायचे ते बघायचे असेल तर खालील video बघा
साहित्य
१५० ग्रॅम (अर्धी वाटी) साबुदाणा
८५ ग्रॅम (१ मध्यम) बटाटा १ सेमी छोटे तुकडे कापून
३५ ग्रॅम (पाव वाटी) शेंगदाण्याचे कूट
१ मोठा चमचा तेल किंवा तूप
२ हिरव्या मिरच्या चिरून
१ छोटा चमचा जीरे
अर्ध्या लिंबाचा रस
१ छोटा चमचा साखर
पाऊण चमचा मीठ
सजावटीसाठी:
१ मोठा चमचा ओल्या खोबऱ्याचा कीस
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
एका पातेल्यात साबुदाणे घेऊन त्यात साबुदाणे बुडेपर्यंत पाणी घालून ठेवावे.
२० ते २५ मिनिटानंतर संपूर्ण पाणी काढून, कमीतकमी ६ तासांसाठी ठेवावे.
भिजलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर आणि लिंबू रस घालावा.
हे सगळे मिश्रण चांगले एकत्र करून बाजूला ठेवावे.
कढईत तेल किंवा तूप टाकून, ती मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी.
तेल गरम झाल्यावर त्यात जीरे टाकावे.
जीरे तडतडल्यावर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि बटाट्याच्या फोडी टाकाव्या.
थोडेसे मीठ टाकून, व्यवस्थित ढवळून, २-३ मिनटासाठी झाकण ठेवावे.
मंद आचेवर बटाटे शिजेपर्यंत झाकून शिजवावे.
आता साबुदाण्याचे मिश्रण घालून, हलक्या हातांनी परतून, खिचडी एकत्र करावी.
परत २-३ मिनिटांसाठी झाकण ठेऊन, मंद आचेवर खिचडी शिजू द्यावी.
झाकण उघडून, परत थोडी ढवळून अजून २-३ मिनिटांसाठी झाकून ठेवावी.
साबुदाणे फुलले आणि थोडे पारदर्शक झाले की खिचडी तयार झाली.
गरम गरम साबुदाणा खिचडी खाताना वरून खोबरे, कोथिंबीर पेरून द्यावी.
अशाच मस्त रेसिपी तुम्हांला eMail वर सगळ्यात पहिल्यांदा बघता येतील. Subscribe करा.तयारीसाठी लागणारा वेळ: ६ ते ८ तास
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १२ मिनटे
वाढणी: २ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ९४५.८५ Kcal
मेद: २८.१७५ ग्रॅम
प्रथिने: १०.९८ ग्रॅम
कर्बोदके: १६२.३०५ ग्रॅम
फॉलिक आम्ल: 3.72 ug
To read this recipe in English please Click Here ‘Sabudana Khichdi Recipe‘.






My favorite recipe but I prepared this in bright red color