
शंकरपाळे म्हणजे दिवाळीमध्ये बनवल्या जाणाऱ्या फराळाचा एक अविभाज्य घटक. आम्ही याला गोड शंकरपाळे असे म्हणतो, पण मला आज कळले की खूप सारे जण याला शंकरपाळी असे म्हणतात(including google). असो नाव काहीही असलं तरी ह्याची जी जिभेवर रेंगाळणारी हलकी गोड चव आणि वेलचीचा स्वाद, यामुळे वाटीभर खाल्ले तरी समाधान होत नाही.
जेव्हा आमच्याकडे हे order ला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बनायचे तेव्हा एक वाटी तूप, एक वाटी दुध आणि एक वाटी साखर असं प्रमाण घेऊन बनवायची पद्धत होती. २० वर्षांपूर्वी तूप म्हणजे डालडा. हल्लीच अलीकडे ४-५ वर्षांपूर्वी आम्ही धंदा बंद झाल्यानंतर थोडीशी पद्धत आणि प्रमाण बदलले. आता ह्या पद्धतीने हे शंकरपाळे खुसखुशीत तर होतात आणि डालडा न वापरता अतिशय कमी तूप वापरून करता येतात.
तुम्हीही एकदा ह्या पद्धतीने करून बघा. पारंपारिक पद्धतीत मैदाच वापरतात. मीही इथे मैदा वापरलाय. पण same प्रमाण वापरून गव्हाच्या पिठाचेही शंकरपाळे मस्त लागतात. मी कधीतरी तसेही बनवते. शंकरपाळे मध्यम आचेवर तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण वेळ गेला तरी चालेल पण gas मोठा करून हे शंकरपाळे तळायचे नाहीत.
मधल्या वेळच्या खाऊच्या वेळी बिस्किटं किंवा बाहेरून आणलेले तळणीचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले, शेंगदाणा तेलात तळलेले शंकरपाळे खाणे हे केव्हाही उत्तम. दिवाळीची वाट न बघता आता लगेच बनवा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा.
मधल्या वेळच्या खाण्यासाठी अजून काही पदार्थ खाली दिले आहेत.
साहित्य:
१ वाटी दूध
१ वाटी साखर
पाव वाटी तूप
१ मोठा चमचा वेलची पूड
१ वाटी बारीक रवा
भिजेल तेवढा मैदा (साधारण ३ वाटी)
चिमूटभर मीठ
कृती:
एका पातेल्यात दूध उकळायला ठेवायचं.
दुध उकळ्यावर त्यात साखर घालायची. साखर वितळली की तूप घालून gas बंद करायचा.
हे मिश्रण कोमट झालं की एका परातीत घ्यायचं. त्यात रवा, मीठ आणि वेलची पूड टाकून घ्यायची.
आता वाटी-वाटी मैदा टाकून हे पीठ भिजवायला घ्यायचं. हळूहळू लागेल तेव्हढा किंवा भिजेल तेव्हढा मैदा घ्यायचा आणि मऊसर पीठ भिजवायचं.
थोडा तेलाचा हात लावून पीठ सारखं करून अर्धा ते एक तास झाकून बाजूला ठेऊन द्यायचं.
आता एक तासाने ह्या कणकेतून एक मोठा गोळा तोडून, पोळीच्या आकारात लाटून घ्यायचा.
कातण असेल तर, नसेल तर सुरीने शंकरपाळी चे आकार कापून घ्यायचे.
तेल मंद gas वर गरम करण्यास ठेवाचे. तेल मध्यम गरम असेल तेव्हा शंकरपाळे सोडून चांगले खरपूस तळून घ्यायचे.
तयारीसाठी लागणारा वेळ: ६० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ४५ मिनटे
वाढणी: ६ जणांसाठी






Leave a Reply