कोकम कढी
सोलकढीला काहीजण कोकमाची कढी किवां कोकमसार असेही म्हणतात. सोलकढी न आवडणारा कोकणी माणूस मिळणे विरळाच. सोलकढी मला कधी आवडायला लागली हे सांगणे कठीण आहे, पण पहिली आठवण सोलकढीविषयी खूप खूप जुनी आहे.
एकदा आम्ही आमच्या आज्जीच्या नातेवाईकाकडे गेलो होतो. त्यांच्याकडे जेवायला मसालेभात आणि सोलकढीचा बेत होता. त्यांच्याकडून आल्यावर मला आठवतंय आम्ही आजीला सोलकढी करेपर्यंत चांगलच भंडावून सोडले होते. आजीनेही आम्ही मुंबईला परतण्याअगोदर चांगली ३ ते ४ वेळा सोलकढी केल्याचे आठवतंय मला.
आत्ता आत्ता पर्यन्त मी गरम पाण्यात कोकम भिजवून त्याचा आंबट रस घालून सोलकढी बनवत होते, पण आता मी कोकम आगळ वापरून करते. कोकमाचे आगळ आता मुंबईत बरेच ठिकाणी मिळू लागले आहे. ते वापरल्याने सोलकढी बनवण्याचा वेळही वाचतो आणि तिला सुंदर गुलाबी रंगही येतो.
To read this recipe in English please Click Here.
साहित्य
३ वाटी नारळाचे दुध
पाव वाटी कोकमाचे आगळ
अर्धा छोटा चमचा जीरे
७-८ कढीपत्त्याची पाने
१ हिरवी मिरची उभी चिरून
२-३ लसूण पाकळ्या बारीक चिरून
अर्धा छोटा चमचा मीठ
१ छोटा चमचा साखर
१ चमचा साजुक तूप
कृती
कढईत तूप टाकून, ती मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी.
तूप गरम झाल्यावर त्यात जिरे टाकाव.
जिरे तडतडले की कढीपत्ता, मिरची आणि बारीक चिरलेली लसूण टाकावी.
१० ते १५ सेकंद परतून, त्यात नारळाचे दुध ओतावें.
कोकम आगळ, मीठ आणि साखर टाकून एकदा ढवळून घ्यावं.
चव बघून मीठ, आगळ किवां साखर कमी वाटली तर घालावी.
उकळी येण्याअगोदर सोलकढी आचेवरून काढून थंड होण्यास ठेवावी.
थंड झाल्यावर गाळून पिण्यास द्यावी.
तयारीसाठी लागणारा वेळ: ८ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ६ मिनटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ११०६ Kcal
मेद: १०० ग्रॅम
प्रथिने: ८.४ ग्रॅम
कर्बोदके: ४३.२ ग्रॅम
To read this recipe in English please Click Here.
Leave a Reply