रताळ्याचा कीस
माझी आई आणि आजी, रताळ्याचा कीस अगदी अप्रतिम बनवतात. त्यांच्या मते फक्त रताळ्याचा कीस फार चिकट होतो त्यामुळे त्या दोघीही त्यात बटाटा घालतात. त्यामुळे लहानपणापासूनच रताळ-बटाट्याचा कीस हा उपवासाला आमच्याकडे बरेचदा असतो.
बटाटे वापरण्याबाबत माझा काही आक्षेप नाही, पण कित्येकदा मला वाटते की फक्त रताळ्याचा कीस जास्त पौष्टिक होतो. डायबिटीस असलेल्या लोकांनाही हा कीस न्याहारीला पोटभरीचा होतो.
रताळ्यामध्ये B1, B2 आणि B6 विटामिन खूप प्रमाणात असते. शिवाय रताळे खाल्यावर, पचन होताना त्यातील साखर रक्तामध्ये अगदी हळुहळू मिसळते. सगळ्यांसाठीच आहारात रताळे समाविष्ठ करणे आतिशय गुणकारी असते. वजन कमी करायचे असल्यास रताळ्याचा कीस आठवड्यातून दोन-तीनदा न्याहारीमध्ये समाविष्ठ करायला हरकत नाही.
उपासासाठी हलके पदार्थ
आता पाककृतीकडे मोर्चा वळवूया. तर महत्वाचा मुद्दा असा होता की नुसता रताळ्याचा कीस केला तर तो चिकट होतो. आता ह्या गोष्टीवर उपाय असा आहे की, रताळे किसून किमान दोन तास थंड पाण्यात भिजवून ठेवा. थंड पाणी म्हणजे अगदी बर्फाच्या पाण्यात. मी रात्रीच रताळी किसून थंड पाण्यात भिजवून फ्रीजमध्ये ठेवते. सकाळी उठल्यावर, गाळण्यावर किसलेली रताळी काढते आणि पुढील कृती करते. १० मिनटात गरमागरम न्याहारी तयार होते.
सूचना : रताळी चांगली धुवून, सगळी माती खरवडून काढा. सालासकटच किसून रताळी ह्या पाककृतीसाठी वापरा.
रताळ्याचे oven मध्ये केलेले फ्रेंच fries सुद्धा एकदा करून बघा. तुम्हांला नक्की आवडतील.
साहित्य
३५० ग्राम (१ मोठे) रताळे
२ मिरच्या छोटे तुकडे करून
१ चमचा तेल / तूप
अर्धा छोटा चमचा जीरे
१ छोटा चमचा साखर
चवीनुसार मीठ
२ मोठे चमचे दाण्याचे कूट
१ चमचा खोवलेले खोबरे
कृती
रताळी चांगली धुवून किसून घ्यावीत.
एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात बर्फाचे तुकडे घालावेत.
ह्या थंड पाण्यात किसलेली रताळी घालावीत.
दोन तासांनी, चाळणीवर ही किसलेली रताळी घालून सर्व पाणी निथळून घ्यावे.
नॉनस्टिक भांड्यात तूप किवां तेल घालून हे भांडे मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावे.
तूप गरम झाल्यावर त्यात जीरे आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत.
लगेच त्यावर किसलेली रताळी टाकावीत.
थोडेसे मीठ घालून, सर्व एकत्र करावे आणि ५-७ मिनटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे.
आता झाकण काढून त्यात दाण्याचे कूट, साखर आणि नारळाचा चव घालून हलक्या हाताने एकत्र करावे.
परत झाकण ठेवून दोन मिनटे शिजू द्यावे.
दोन मिनिटांनी झाकण काढून गरमागरम खायला द्यावे.
एकूण वेळ: २ तास १८ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी






This recipe is really very nice. And to keep Ratali keep in cold water is very important tip . Thanks a lot for sharing this recipe.
Thank you for sharing your opinion! 🙂