
एकादशी आणि दुप्पट खाशी! खरचं आहे ते. मी कधी उपास वैगरे करत नाही पण खूप वेळा उपासाचे पदार्थ दिवसभर खाते. जसे सकाळी साबुदाणा खिचडी, दुपारी भोपळ्याची भाजी आणि उपासाचे थालीपीठ आणि रात्री दही भेंडी. जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखा खाऊन पिऊन उपास करणारे असाल तर मग तुम्ही ही tasty अशी उपासाची थाळी बनवून बघा.
ह्या उपासाच्या थाळीत मी भोपळ्याची खीर, राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि सुरणाची रस्सा भाजी बनवली आहे. भोपळ्याची खीर कशी बनवायची हे या आधी मी दाखविले आहे.

ही संपूर्ण उपासाची थाळी मी अवघी ४० मिनिटांत बनवली. पण अर्थातच त्यासाठी काही पूर्वतयारी मी करून ठेवली होती. सुरण साफ करून त्याच्या चौकोनी फोडी कापून ठेवल्या होत्या. भोपळ्याच्या दोन फोडी साल काढून करून ठेवल्या होत्या. नारळ खरवडून फ्रीज मध्ये ठेवला होता.
राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी त्यात थोडे आरारूट पीठ घातले आहे. काही जण उकडलेला बटाटा घालतात किंवा थोडं साबुदाण्याचं पीठ घालूनही ह्या पुऱ्या करतात. आपण पहिल्यांदा ह्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया.

साहित्य:
१५० ग्राम राजगीरा पीठ
५० ग्राम आरारूट पीठ
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
पीठ मळण्यासाठी गरम पाणी
कृती:
एका परातीत राजगिरा पीठ चाळून घ्यावं.
त्यात आरारूट आणि मीठ घालावं.
हे जिन्नस सुखेच एकत्र करून घ्यावेत.
आता ह्यात गरम पाणी घालून काळजीपूर्वक पीठ मळून घ्यावं.
खूप वेळ पीठ न मळता, पिठाचा गोळा एकत्र आला की थोडं तेलाचा हात लावून ३० मिनिटांसाठी झाकून ठेवावं.
आता अर्ध्या तासाने, पीठाचे लहान गोळे लाटून वाटीच्या साह्याने एक सारख्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.
तेल तापत ठेवावे. तेल कडकडीत तापले की ह्या पुऱ्या तळून घ्याव्यात.

आता आपण बघूया की चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची.
साहित्य:
२०० ग्राम सुरणाचे चौकोनी छोटे तुकडे
२-३ आमसुलाचे तुकडे
१ चमचा तूप
चवीनुसार मीठ
छोटा चमचा गुळ
बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्ध्या लिंबाचा रस
वाटणासाठी:
अर्धी छोटी वाटी ओलं खोबरं
थोडीशी कोथिंबीर
२ लाल सुक्या मिरच्या
छोटासा आल्याचा तुकडा
८-१० कडीपत्याची पाने
फोडणीसाठी:
अर्धा छोटा चमचे जीरे
२ हिरवी वेलची
१ छोटा तुकडा दालचिनी
४-५ काळी मिरी
कृती:
वाटणासाठी दिलेले सर्व साहित्य बारीक वाटून पेस्ट करून घ्यायची.
एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचे.
पाणी उकळले की त्यात मीठ आणि आमसुलाचे तुकडे टाकायचे.
आता त्यात सुरणाचे तुकडे टाकून ५ ते ७ मिनटे शिजवून गाळण्यावर टाकून थंड पाण्याखाली धुवून निथळत ठेवायचे.
एका कढईत तूप घेऊन फोडणीचे सर्व साहित्य टाकायचे.
जीरे तडतडले की सुरणाचे तुकडे टाकून २ मिनटे परतून घ्यायचे.
आता त्यात वाटण टाकायचे. अर्धी वाटी पाणी टाकायचे.
सर्व एकत्र करून, झाकण लावून ३ ते ४ मिनिटे शिजू द्यायचे.
चवीनुसार मीठ आणि गुळ टाकायचे.
२ मिनटे शिजल्यावर gas बंद करायचा.
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून गरम गरम खायला घ्यायचे.
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ४० मिनटे
वाढणी: २ जणांसाठी






Leave a Reply