
उपास म्हटलं की साबुदाणा खिचडी आणि रताळ्याचा कीस असे पदार्थ नेहमीच केले जातात. आज मी झटपट असे होणारं उपासाचे थालीपीठ कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे.
मी ३ ते ४ बटाटे नेहमीच उकडून फ्रीजमध्ये ठेवते. ह्या थालीपीठांसाठी भाजाणीही मी तयारच बाजारातून आणले होते. ह्यामुळे ही थालीपीठ अगदी ५ मिनटात होतात.
ह्या भाजाणीत भगर, साबुदाणा, राजगिरा आणि शिंगाड्याच पीठ होते. हा खूपच पौष्टिक पदार्थ आहे, उपास नसेल तरीही तुम्ही ही थालीपीठ बनवून नाश्त्यासाठी खाऊ शकता. उपासासाठी थोडे वेगळे आणि तिखट पदार्थ करायचे असतील तर खाली लिंक दिल्या आहेत.
उपासासाठी रताळ्याचे baked fries
एक मोठं थालीपीठ हे एका माणसासाठी पुरेसं होतें. बाजारातून २०० ग्राम आणलेल्या पिठात ५ मोठी थालीपीठ आरामशीर होतात. आता पुढच्यावेळी उपासाला ही थालीपीठ करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा.
साहित्य
२०० ग्राम उपासाची भाजाणी
२०० ग्राम बटाटे उकडून सोलून
१ छोटा चमचा जीरे
२ हिरव्या मिरच्या
७-८ कढीपत्त्याची पाने
चवीनूसार मीठ
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
कृती
उकडलेले बटाटे छोट्या किसणीवर किसून घ्यावेत.
जीरे, कढीपत्त्याची पाने आणि मिरचीचे छोटे तुकडे करून खलबत्त्यात खलून घ्यावे.
कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यावी.
आता एका मोठ्या वाडग्यात भाजाणी घेऊन त्यात कुटलेले जीरे-मिरची, कोथिंबीर, किसलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ घ्यावे.
सर्व छान एकत्र करून एक गोळा होईपर्यंत मळावे. अगदीच जरुरी असेल तरच पाण्याचा वापर करावा.
आता ह्या गोळ्याचे ५ समान भाग करावेत.
एक भाग घेऊन बटरपेपरवर हा गोळा थालीपीठाच्या आकारात थापावा.
आता भीडाचा तवा गरम करून त्यावर हे थालीपीठ छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
आता अशाच प्रकारे बाकीचे गोळे थापून, सगळी थालीपीठ भाजून घ्या.
तयारीसाठी लागणारा वेळ: ५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३५ मिनटे
वाढणी: २ जणांसाठी






Leave a Reply